Indian Railways News => Topic started by irmafia on Jun 09, 2013 - 03:02:27 AM


Title - अंबरनाथमध्ये पुराचा धोका
Posted by : irmafia on Jun 09, 2013 - 03:02:27 AM

अंबरनाथ पूर्वेतील रेल्वे मार्ग व बी कॅबिन रस्त्याच्या मध्ये असलेला नाला बुजविण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. पूर्व भागातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहून नेणारा हा प्रमुख नाला असून , रेल्वेने तो निम्म्यापेक्षा जास्त बुजविल्याने या भागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होणार आहे. यामुळे मोठी हानी देखील होण्याची शक्यता असून , याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार राहील असा इशारा नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिला आहे.

पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई करण्यात टाळाटाळ करत असलेल्या रेल्वेने गेल्या काही दिवसांपासून जेसीबी व डंपरद्वारे येथील नालाच बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. मातीचा भराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी रेल्वे मार्गावर शिरत असल्यामुळे सिग्नल यंत्रणा निकामी होण्याची शक्यता असल्याने हा नाला बुझवत असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेच्या नव्या ट्रॅकसाठीही मार्ग केला जात असल्याची चर्चा आहे. मात्र या नाल्याची रुंदी कमी करण्यास नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांनी प्रखर विरोध केला आहे. नाल्याची रुंदी कमी केल्यास पाणी शहरामध्ये घुसून जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी रेल्वेने नगरपालिकेला विश्वासात घेण्याची गरज होती. मात्र रेल्वेच्या वतीने कोणतीही कल्पना न देताच हे काम सुरू करण्यात आले.

रेल्वेच्या या बेजाबदार वर्तनाचा नगराध्यक्षांनी निषेध केला असून , मध्य रेल्वे प्रशासनाच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. नाल्याची रुंदी रेल्वे प्रशासनाने कमी केल्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होईल व हे पाणी बी कॅबिन परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये जाईल. जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा या पत्राद्वारे दिला आहे.